मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ साठी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या किरॉन पोलार्डला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आयपीएल २०१० पासून मुंबईकडून खेळत होता. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला कायम ठेवले असले तरी ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि मिचेल सँटनर यांना संघातून वगळले आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सादर केली आहे. मुंबई आणि चेन्नई या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहेत. चेन्नईने रवींद्र जडेजाला कायम ठेवत ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि मिचेल सँटनर यांच्याशी फारकत घेतली आहे. मुंबईचा विचार करता त्यांनी किरॉन पोलार्डला सोडले आहे.
आयपीएलच्या १६ व्या हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. लिलावापूर्वी, बीसीसीआयने प्रत्येक फ्रँचायझीला १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने अगोदरच सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवली आहे.
मुंबई इंडियन्स –
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२ अविस्मरणीय होते. गुणतालिकेत ते दहाव्या स्थानावर राहिले होते. ही त्यांच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी आहे. या अगोदर त्यांनी ५ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
कायम ठेवलेले आणि सोडण्यात आलेले मुंबईचे खेळाडू –
मुंबईने १० खेळाडूंना कायम ठेवले असून ५ खेळाडूंना सोडले आहे. झी चोवीस तासच्या माहितीनुसार, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर फॅबियन अॅलन, किरॉन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकीन यांना रिलीज करण्यात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज –
आयपीएल २०२२ च्या आधी, यलो आर्मीने अनुभवी एमएस धोनीच्या जागी जडेजाला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. तथापि, त्याच्या नेतृत्वाखाली, सीएसकेला स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक मोठा निर्णय घेण्याची वेळ आली. कारण जडेजाला दुखापत होण्याआधीच कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये फक्त ११६ आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. सीएसकेला आयपीएल २०२२ च्या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी फक्त ४ सामने जिंकता आले होते.
हेही वाचा – Team Zimbabwe: …अन् सिकंदर रझाला विमानातच भेट म्हणून मिळाली तीन घड्याळं
कायम ठेवलेले आणि सोडण्यात आलेले सीएसकेचे खेळाडू –
चेन्नईने ९ खेळाडूंना कायम ठेवले असून ४ खेळाडूंना सोडले आहे. चेन्नईने महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चहर यांना आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी कायम ठेवले आहे. त्याचबरोबर ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, नारायण जगदीशन आणि मिचेल सँटनर यांना सोडण्यात आले आहे.