भालाफेकपटू नीरज चोप्रा आज सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याच्या आधी ऑलिम्पिकच्या १२५ वर्षांच्या इतिहासात कोणताही भारतीय खेळाडू अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकू शकला नाही. त्याच्या कामगिरीमुळे भारताने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदाच ७ पदके जिंकली. नीरज चोप्राची कामगिरी पाहता, आयपीएलमधील धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याचे कौतुक करत बक्षीस जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेकडून नीरज चोप्राला एक कोटी रुपये देण्यात येतील. सीएसकेच्या प्रवक्त्याने सांगितले, “आम्हाला एक भारतीय म्हणून नीरज चोप्राचा अभिमान आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील त्याच्या यशामुळे लाखो भारतीयांना खेळात येण्यासाठी प्रेरणा मिळेल. यासह ते खेळाची सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करतील.” नीरज चोप्राच्या सन्मानार्थ फ्रेंचायझीकडून ८७५८ क्रमांकाची विशेष जर्सीही जारी केली जाईल. नीरज चोप्राने टोक्योमध्ये ८७.५८मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

 

नीरजवर बक्षिसांचा पाऊस

नीरजवर सर्व बाजूंनी बक्षिसांचा पाऊस पडला आहे. त्याला १२ कोटींची रक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. हरयाणा सरकारने ६ कोटी देण्याचे म्हटले आहे. याशिवाय पंजाब सरकारकडून २ कोटी, बीसीसीआय आणि सीएसकेकडून प्रत्येकी १ कोटी, मणिपूर सरकारकडून १ कोटी आणि भारत सरकारकडून ७५ लाख दिले जातील.

हेही वाचा – नीरज चोप्राच्या ‘गोल्डन’ कामगिरीवर शेतकरी वडिलांची पहिली प्रतिक्रिया; फुटला भावनांचा बांध

तब्बल १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk announce rs one crore award for neeraj chopra to create special jersey adn