CSK bought Sameer Rizvi for Rs 8.4 crore : आयपीएल २०२४ च्या लिलावातही फ्रँचायझी अनकॅप्ड खेळाडूंवर मोठा खर्च करत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आता लिलावात लाभ मिळाला आहे. त्यातलाच एक समीर रिझवी आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावात समीर रिझवीची मूळ किंमत २० लाख रुपये होती, परंतु देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन, फ्रँचायझींनी त्याच्यावर जोरदार बोली लावली. शेवटी चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला ८.४ कोटी रुपयांना विकत घेतले.
कोण आहे समीर रिझवी?
समीरला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. पण अखेर यश चेन्नईच्या हाती आले. उजव्या हाताचा सुरेश रैना म्हणून ओळखला जाणारा समीर रिझवी हा उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील रहिवासी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, समीरने यूपीसाठी अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत, ज्या दरम्यान त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. अनेकदा तो फिरकीविरुद्ध खेळतो तेव्हा टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाची झलक त्याच्यामध्ये दिसते. त्यामुळे त्याला उजव्या हाताचा सुरेश रैना म्हणतात. आता समीर आपला पहिला आयपीएल हंगाम खेळताना दिसणार आहे.
समीर रिझवीची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द –
समीर रिझवीने अलीकडेच देशांतर्गत खेळल्या गेलेल्या लिस्ट ए सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे याआधी देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्येही त्याने आक्रमक फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. हा २० वर्षांचा युवा खेळाडू मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत देशांतर्गत दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने फक्त १७ धावा केल्या आहेत.
समीरच्या लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ११ सामन्यात २९-२८च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६१ धावा आहे. त्याच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर केवळ ११ सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. या सामन्यांमध्ये त्याने ४९.१६च्या सरासरीने आणि १३४.७० च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने २९५ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ७५ आहे. मधल्या फळीत सीएसकेसाठी समीर चांगला फलंदाज ठरू शकतो.