२०१८ च्या आयपीएल हंगामासाठी, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल संघमालकांसाठी खेळाडू कायम ठेवण्याचं (Retention Policy) धोरण येत्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रत्येक संघाला लिलावादरम्यान ३ खेळाडूंना (२ भारतीय, १ परदेशी) कायम ठेवण्याची मुभा मिळू शकते. २०१७ च्या हंगामात आयपीएल सामने खेळणाऱ्या संघांना आपल्या संघातील खेळाडूंना कायम राखण्याची मुभा मिळणार आहे. तर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आलेल्या, चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांना गुजरात आणि पुण्याच्या संघातील खेळाडूंची निवड करण्याची संधी मिळणार आहे.
तामिळ भाषेतून प्रसिद्ध होणारं दैनिक दिनथंतीने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे. दिनथंतीच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपरकिंग्ज व्यवस्थापनाने महेंद्रसिंह धोनी, रविचंद्र आश्विन आणि फाफ डू प्लेसी या खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचं ठरवलं असल्याचं कळतंय. मात्र हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापनाने, हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण आपल्या ट्वीटर हँडलवर दिलं आहे.
Lots of rumours online about not retaining #ChinnaThala. Don’t Believe! We want to bring the pride back together. A roaring #SummerIsComing #WhistlePodu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 14, 2017
२०१३ साली आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघावर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा घालण्यात आली होती. २ वर्षांच्या बंदीनंतर आता हे संघ २०१८ साली आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना सुरेश रैनाने पहिल्या काही हंगामांमध्ये धावांचा रतीब घातला होता. मात्र दिनथंतीच्या वृत्तानुसार, रैनाऐवजी संघ व्यवस्थापनाने आश्विनला पसंती दिल्याचं कळतंय. आयपीएलच्या ११ व्या हंगामात, ५०० खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत १० हंगाम गाजवलेले खेळाडू, पुढच्या हंगामात कोणाकडून खेळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.