भारतीय संघाचा यष्टीरक्ष दिनेश कार्तिक गेले काही महिने संघाबाहेर आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात दिनेश कार्तिकची आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. मात्र या स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं, निवड समितीने धोनी आणि कार्तिक दोघांनाही विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. यानंतर आतापर्यंत दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करु शकलेला नाही. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिककडे सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व आहे. याआधी दिनेशने १३ वर्षांत ६ संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र चेन्नई सुपरकिंग्ज संघात स्थान न मिळाल्याचं दुःख दिनेश कार्तिकच्या मनात कायम आहे.
चेन्नईच्या संघाने आपल्याऐवजी धोनीची संघात निवड केली हे दिनेश कार्तिकला पहिल्यांदा पचनी पडलं नव्हतं. Cricbuzz संकेतस्थळावर समालोचक हर्षा भोगले यांच्या कार्यक्रमात बोलत असताना दिनेश कार्तिकने आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. “आयपीएलच्या लिलावात चेन्नईने सर्वात प्रथम धोनीची निवड केल्याचं मला समजलं, धोनीसाठी त्यांनी चांगली रक्कम मोजली होती. तो माझ्यापासून काही अंतरावर बसला होता, पण चेन्नईचा संघ मला निवडणार आहे याबद्दल तो मला एक शब्दही बोलला नाही. माझ्यामते त्याला हे माहिती नसावं, पण त्याक्षणी कोणीतरी माझ्या छातीत सुरी खुपसल्यासारखं झालं होतं.”
यापुढे बोलताना दिनेश म्हणाला, “धोनीनंतर कदाचित ते माझी निवड करतील असं मला वाटत होतं, पण त्यानंतर जवळपास मी १३ वर्ष वाट बघतोय पण चेन्नईचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली नाही. पहिल्या हंगामासाठी चेन्नई आपल्यावर बोली लावेल असा मला ठाम विश्वास होता. त्याक्षणी माझा टी-२० क्रिकेटमधला रेकॉर्ड चांगला होता, तामिळनाडूकडून खेळताना मी चांगली कामगिरी केली होती. चेन्नईचा संघ आपल्याला कर्णधारपद देईल की नाही हा प्रश्नही माझ्या मनात त्यावेळी सतत घोळत होता. परंतु तसं काही झालं नाही.” २०१८ साली झालेल्या लिलावात चेन्नईचा संघ कार्तिकवर बोली लावत होता, मात्र कोलकात्याने ३.६ कोटींची रक्कम लावत कार्तिकला आपल्या संघात घेतलं.