रविवारचा दिवस चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी सुपर सण्डे ठरला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. ऋतुराज गायकवाड (७०) आणि रॉबिन उथप्पा (६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-१’ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर चार गडी आणि दोन चेंडू राखून मात केली.
अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (नाबाद १८) करनच्या गोलंदाजीवर तीन चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनी रविंद्र जाडेजा आणि ब्राव्होच्या आधी फलंदाजीला आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीवरुन अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
धोनीचा हा व्हिंटेज अवतार पाहून त्याचे चाहते सैराट झालेले असतानाच मैदानामध्ये प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी आलेले चेन्नई सुपर किंग्सचे दोन चिमकुले फॅन्सही धोनीने विजयी चौकार लगावल्यानंतर भावूक होऊन रडू लागले. दोघेही रडत असल्याचा क्षण कॅमेराने अचूक टिपला आणि तो व्हायरल झाला. या दोघांचे रडतानाचे फोटोही चेन्नईच्या चाहत्यांनी व्हायरल करत चेन्नईचा संघ आणि धोनी हे केवळ संघ आणि खेळाडू नसून एक भावना आहे असं चाहत्याचं म्हणणं होतं.
आम्हालाही असंच वाटतं होतं…
धोनीला असं खेळताना पाहून…
हे धोनीचे कट्टर चाहते
बरं हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होण्याबरोबरच मैदानातील मोठ्या स्क्रीनवरही दिसल्यानंतर धोनी सामना संपल्यानंतर ही रडणारी मुलं जिथं बसली होती तिथं गेला आणि त्यांना एक खास भेट दिली. धोनीने या दोघांनाही आपली स्वाक्षरी असलेला चेंडू भेट दिल्याचं पहायला मिळालं. आपल्या चाहत्यांच्या प्रेमाची धोनीने घेतलेली ही दखल अनेकांना भावली आहे.
धोनीने दिलं खास गिफ्ट
तिच्यासाठी आनंदाचा क्षण
त्यांसाठी अविस्मरणीय दिवस
धोनीने दिली खास भेट
धोनीवर चाहत्यांनीच नाही तर अनेक आजी माजी खेळाडूंनीही कौतुकाचा वर्षाव केलाय. आधीच्या काळाजी धोनीची झलक दिसल्याबद्दल चाहत्यांबरोबर मान्यवरांनीही समाधान व्यक्त केलं आहे. आता अंतिम सामन्यामध्ये धोनी कसा खेळतो याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.