मंगळवारी चेन्नईने कोलकातावर ७ गडी राखून विजय मिळवला. घरच्या मैदानावर चेन्नईचा हा सलग चौथा विजय आहे. त्यानंतरही कर्णधार एम.एस धोनी खेळपट्टीवर नाराज आहे. सामन्यानंतर बोलताना धोनीने खेळपट्टीवर असलेली नाराजी बोलून दाखवली. सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘ या खेळपट्टीवर आता आणखी खेळायला नको. या खेळपट्टीमुळे मोठी धावसंख्या करणे कठीण आहे. ब्राव्होच्या दुखापतीमुळे संघातील संतुलन बिघडले आहे. आम्हाला बऱ्याच समस्येला सामोरं जावं लागतेय. खेळपट्टी संथ असतानाही आम्ही विजय मिळवला.’

धोनीने यावेळी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंह आणि इम्रान ताहिरचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘भज्जी ज्या सामन्यात खेळला त्यामध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. मी ताहिरला संधी दिली आणि त्याने आपली भूमिका चोख पार पडली. ताहिरला जसे सांगेल तसा तो चेंडू टाकतो. ताहिर आणि भज्जी उत्कृष्ट गोलंदाज आहेत.’

आयपीएलच्या या सत्रातात आतापर्यंत चेन्नईने होम ग्राऊंडवरील सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. येथे झालेल्या चारही सामन्यात चेन्नईने विजयी पताका फडकावली आहे. त्यानंतरही धोनीने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी चेन्नईने कोलकात्याचा सात विकेटने पराभव केला. या पाचव्या विजयासाह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाताने ९ गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकांत १०८ धावा केल्या होत्या. चेन्नईने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.