‘सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने ओळखली जाणारी लांब अंतराच्या शर्यतीमधील राष्ट्रकुल पदक विजेती कविता राऊत पुण्यात सुरू असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवारी शेवटच्या दिवशी ५,००० मीटर धावण्याची शर्यत होणार आहे. त्यामध्ये तिचा सहभाग असेल.
कविताचे ५,००० व १०,००० मीटर धावणे हे दोन हुकमी क्रीडा प्रकार आहेत. मात्र येथे फक्त ५,००० मीटर धावण्याच्या शर्यतीकरिता तिची प्रवेशिका देण्यात आली आहे. चेन्नईत झालेल्या आंतर-राज्य स्पर्धेच्या वेळी ती तापामुळे आजारी पडली. अद्यापही ती पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत होते. तथापि, तिने दोन दिवसांपूर्वी येथे सराव करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळेच तिच्या सहभागाविषयीची शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास भारताला या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविण्याची अधिक संधी आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी एक डझन क्रीडा प्रकारांच्या अंतिम फेरी होणार आहेत. त्यामध्ये पुरुष गटाच्या ४०० मीटर अडथळा, तिहेरी उडी, उंच उडी, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, ४ बाय ४०० मीटर रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. महिलांच्या गटात ४०० मीटर अडथळा शर्यत, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, ४ बाय ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांच्या अंतिम फेरी होतील.
स्पर्धेचा समारोप सायंकाळी ७.४५ वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंदर सिंग यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Story img Loader