एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे ते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या निर्णयांना आव्हान देऊ शकत नाहीत असे भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी म्हटले आहे. ते निवड समितीचे अध्यक्षही होते.
करुण नायर आणि मुरली विजय या दोघांना कसोटी संघातून वगळण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरमाणी यांनी हे मत व्यक्त केले. संघातून वगळण्याच्या आधी किंवा नंतर निवड समितीमधील कुठल्याही सदस्याने आपल्याशी चर्चा केली नाही असा दावा करुण नायर आणि मुरली विजय दोघांनी केला. एमएसके प्रसाद यांनी त्यांचा दावा फेटाळून लावताना दोघांना संघातून वगळण्याची माहिती देण्यात आली होती असे सांगितले.
संघ निवडीच्या वादाबद्दल किरमाणी यांना विचारले असता ते म्हणाले कि, मला विचाराल तर प्रशिक्षक या नात्याने रवी शास्त्री मुख्य निवडकर्ता बनला आहे. तो, कर्णधार कोहली आणि संघातील वरिष्ठ सदस्य चर्चा करतात आणि त्यांना कसा संघ हवा आहे ते निवड समितीसमोर ठेवतात. सध्याच्या निवड समितीकडे शास्त्री आणि कोहलीच्या तुलनेत अनुभव कमी आहे. त्यामुळे ते एखाद्या निर्णयावरुन शास्त्री आणि कोहली बरोबर वादविवाद करू शकत नाहीत असे ६८ वर्षीय किरमाणी म्हणाले. २००० साली सय्यद किरमाणी भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते.
सध्याच्या पाच सदस्य समितीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटचा फारसा अनुभव नाहीय. निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. शरणदीप सिंग दोन कसोटी, पाच वनडे, देवांग गांधी चार कसोटी, तीन वनडे, जतीन परांजपे चार वनडे आणि गगन खोडाकडे दोन वनडेचा अनुभव आहे. संघात निवड होण्यामागे तुमच्या नशिबाची सुद्धा महत्वाची भूमिका असते. माझचं उदहारण घ्या, मी ऐन भरात असताना माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले अशी खंत किरमाणी यांनी बोलून दाखवली.