तुमच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली असली म्हणजे तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल, असे नसते. कारण नियती तुम्हाला जमीन दाखवील की अस्मान, हे कुणाच्याही गावी नसते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले, तेव्हा तो दुसरा सचिन तेंडुलकर असल्याचे म्हटले जात होते. काही वर्षांमध्येच तो भारतीय संघात दिसेल, असे भाकीतही काही जणांनी वर्तवले. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. त्याच्या कप्तानीखाली खेळणारे
खेळाडू भारतीय संघात आले तरी त्याची संघात येण्याची काहीच चिन्हे नव्हती. एकामागून एक वादांमध्ये तो अडकत गेला आणि त्याची कारकीर्द संपुष्टात येते की काय, असे वाटत होते. पण ज्या नियतीने ज्याच्या वाटेवर तप्त निखारे पसरवले होते, त्याच नियतीने कृपा करीत त्याला मातीच्या कच्च्या रस्त्यावर आणून ठेवले आहे. आता या मार्गाचे रूपांतर राजमार्गात करण्यात शांत, अभ्यासू आणि संयमी दिसणारा अंबाती रायुडू यशस्वी होतो का, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अंबातीने २००१-०२ साली हैदराबादकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दर्जेदार कामगिरीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय समितीचे लक्ष वेधले आणि त्याला १९ वर्षांखालील भारताच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले. या दरम्यान त्याचा खेळ बहरतच गेला. पण २००५ मध्ये त्याचा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी वाद झाला आणि त्याने आंध्र प्रदेशकडून खेळण्याचा निर्णय घेतला. पण वर्षभरात काही कारणास्तव तो हैदराबादच्या संघात परतला. हैदराबादच्या संघात पुनरागमन केल्यावरही वादाने त्याचा पिच्छा सोडला नाही. मग अंबाती आणि शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यांच्यातील वैमनस्य गाजले. हा वाद इतक्या टोकाला गेला की, अर्जुनने त्याच्यावर यष्टीने हल्ला केला.
त्यानंतर २००७ मध्ये इंडियन क्रिकेट लीगचे (आयसीएल) वारे वाहू लागले. या वेळी बीसीसीआयची परवानगी न घेताच अंबातीने आयसीएलचा मार्ग पत्करला. या निर्णयाचा बीसीसीआयला धक्का बसला आणि त्याला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून निलंबित करण्यात आले. पण या निलंबनाला न जुमानता तो आयसीएलमध्ये ‘हैदराबाद हीरोज’ या संघातून खेळत राहिला. कालांतराने बीसीसीआयने ही स्पर्धा अनधिकृत असल्याचे जाहीर केले, त्याच वेळी त्यांनी अंबातीला ही स्पर्धा सोडून बीसीसीआयमध्ये परतण्याचे आवाहन केले आणि त्याने पूर्ण विचाराअंती आयसीएलला रामराम ठोकला.
आयसीएल सोडून अंबाती बीसीसीआयमध्ये दाखल झाला तरी त्याच्याविषयी भारतीय क्रिकेटच्या मुख्य स्रोतामध्ये सापत्नभाव कायम होते. पण हिरा कितीही झाकला तरी त्याची चमक लपून राहत नाही आणि तेच अंबातीच्या बाबतीतही घडले. त्यानंतर त्याने हैदराबाद सोडून बडोदा क्रिकेट असोसिएशनचा आश्रय घेतला. बडोद्याकडून खेळताना २०१०-११ मध्ये त्याने द्विशतकासह ५६६ धावा केल्या. याच वर्षी त्याला आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील केले. पण पहिल्या मोसमात चांगली कामगिरी करूनही २०११ च्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामावून घेतले नव्हते. पण मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला पुन्हा एकदा संधी देण्याचे ठरवले. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीने सारेच प्रभावित झाले आणि अखेर सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली.
पहिल्याच सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी साकारत विराट कोहलीच्या साथीने त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेले सुरेश रैना, दिनेश कार्तिकसारखे खेळाडू गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात खेळत असले तरी या शापित खेळाडूला आता भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले आहेत. या संधीचे सोने करून उज्ज्वल क्रिकेट कारकीर्द घडवण्याची जबाबदारी आता अंबातीवरच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा