मँचेस्टर : अखेरचा कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा करणाऱ्या ख्रिस गेलच्या निर्णयावर वेस्ट इंडिजचा माजी महान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेलच्या या निर्णयामुळे युवा क्रिकेटपटूंपर्यंत चुकीचा संदेश जात आहे, असे अॅम्ब्रोज यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये अचूक रणनीतीचा अभाव आणि विचारांमध्ये स्पष्टता नसल्याचे अॅम्ब्रोज यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘गेलला जर एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० मालिका खेळावयाची असेल तर मला काहीच अडचण नाही. पण पाच वर्षांपासून तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला खेळण्याची संधी देऊन युवा खेळाडूंवर अन्याय केला जात आहे, असे मला वाटते. एक धोकादायक फलंदाज म्हणून गेलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी देणे योग्य ठरले असते.’’
ब्रेथवेटला दंड
मँचेस्टर : भारताविरुद्धच्या सामन्यात गैरवर्तणूक करणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेटला सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के रक्कम दंड आकारण्यात आली आहे.
ब्रेथवेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळाडूंसंदर्भातील आचारसंहितेच्या कलम २.८चा भंग केला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या निर्णयाबाबत नाराजी प्रकट केल्याबद्दल त्याला शासन करण्यात आले आहे. भारताच्या डावातील ४२व्या षटकात हा प्रकार घडला. जेव्हा पंचांनी त्याचा चेंडू वाइड ठरवला. ब्रेथवेटने चूक कबूल केली असून, सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यापुढे ही सुनावणी झाली.