ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत, भारतीय महिला हॉकी संघाने आज धक्कादायक विजयाची नोंद केली आहे. ऑलिम्पिक विजेत्या इंग्लंडच्या महिला संघावर भारतीय महिलांनी २-१ अशी मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.
भारतीय महिलांनी आजच्या सामन्यात आक्रमक सुरुवात करुन इंग्लंडवर दबाव टाकला. मात्र ३५ व्या मिनीटाला इंग्लंडच्या अलेक्झांड्रा डॅनसनने पहिला गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर भारतीय महिलांनी खचून न जाता आपल्या आक्रमणाची धार कमी होऊ दिली नाही. अखेर नवनीत आणि गुरजीत कौर यांनी भारतासाठी लागोपाठ गोल करत इंग्लंडला जोरदार धक्का दिला. अखेरच्या मिनीटांमध्ये इंग्लंडच्या संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय महिलांनी भक्कमपणे बचाव करत संघाचा विजय निश्चीत केला.