ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेने भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ५७ किलो वजनी गटात राहुलने कॅनडाचा प्रतिस्पर्धी स्टिव्हन ताकाशाहीवर मात करत भारताच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. राहुलने सुवर्णपदक जिंकताच महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात राहुलचे प्रशिक्षक काका पवार व सर्व पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत राहुलला चांगली कामगिरी करुनही संधी नाकारण्यात आली होती. मात्र त्यानंतर दमदार पुनरागमन करत राहुलने आपली प्रतिभा सिद्ध करुन दाखवली आहे.

कुस्तीचं आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणाऱ्या राहुलला लहानपणापासूनचं कुस्तीचं बाळकडू मिळालं आहे. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे मराठवाड्यातल्या बीड परिसरातले नावाजलेले मल्ल होते. त्यामुळे आपल्या वडीलांकडून राहुलने लहान वयात कुस्तीचे अनेक डावपेच शिकले होते. आपल्या वडीलांनी दिलेल्या शिकवणुकीच्या जोरावर राहुलने लहानपणी, जत्रांमध्ये रंगणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी अहमदनगर येथील एका स्पर्धेत राहुलने ३२ किलो वजनीगटात तर वडील बाळासाहेब यांनी ६२ किलो वजनी गटात बाजी मारली होती. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना राहुलचा भाऊ गोकुळ आवारेने ही आठवण सांगितली. सुरुवातीच्या काळात बीडच्या पाटोद्यात कुस्तीचे डावपेच शिकणाऱ्या राहुलने नंतर पुण्यात काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.

अवश्य वाचा – महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ऑस्ट्रेलिया गाजवलं, कुस्तीत भारताला पहिलं सुवर्णपदक

सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, शेती आणि कुस्ती जिंकून मिळणाऱ्या पैशांमध्ये आवारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी हुकल्यानंतर राहुलच्या  मनात खंत कायम होती. मात्र जिद्द न सोडता राहुलने कुस्तीचा सराव सुरु ठेवला. याच जिद्दीच्या आणि सरावाच्या जोरावर राहुलने पदक मिळवल्याचं गोकुळने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केलं. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर २०२० टोकीयो ऑलिम्पीकमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याचा राहुलचा प्रयत्न असल्याचंही गोकुळने स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – आता राहूलकडून ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा – काका पवार

Story img Loader