राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतीय हॉकी संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बरोबरी पत्करावी लागल्यानंतर वेल्सविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र अनपेक्षितरित्या वेल्सच्या संघाने भारताला टक्कर देत शेवटच्या मिनीटापर्यंत सामन्यात रंगत वाढवली. सामना संपण्यासाठी शेवटचं दिड मिनीट बाकी असताना एस.व्ही.सुनीलने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल भारतासाठी या सामन्यात निर्णायक ठरला.
पहिल्या सत्रात दोनही संघांना गोल करण्यात अपयश आलं. वेल्सच्या संघाने आक्रमक चाली रचत भारतीय बचावफळीला चांगलच सतावलं, दुसरीकडे वेल्सच्या गोलकिपरनेही भारताचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अखेर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला १६ व्या मिनीटाला नवोदित दिलप्रीत सिंहने मैदानी गोल करत भारताचं खातं उघडलं. मात्र भारताचा हा आनंद फारकाळ टिकला नाही, कारण गेरेथ फरलाँगला १७ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत वेल्सचा बरोबरी साधून दिली.
यानंतर भारताकडून मनदीप सिंहने २७ व्या, हरमनप्रीत सिंहने ५६ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र गेरेथ फरलाँगने लगेचच पेनल्टी कॉर्नवर गोल करत वेल्सच्या संघाचं आव्हान कायम राखलं. सामना संपण्यासाठी शेवटचं दीड मिनीट शिल्लक असताना भारताच्या एस.व्ही.सुनीलने पेनल्टी कॉर्नवर मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर केलं. यानंतर वेल्सने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय बचावफळीने वेल्सचं आक्रमण थोपवून धरत आपल्या संघाचा विजय निश्चीत केला.