CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. शनिवारी (६ ऑगस्ट) स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं मिळाली. महिलांच्या दहा हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामीने रौप्य पदक जिंकले. यानंतर मराठमोळ्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले. या शर्यतीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर प्रत्येक सेंकदाला किती किंमत असते, याची जाणीव झाल्या शिवाय राहणार नाही.
अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. त्याने ८.११.२० मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. अविनाश हा सुवर्णपदक विजेत्या अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता. केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. फक्त ०.५ सेंकदांच्या फरकामुळे अविनाशचे आणि पर्यायाने भारताचे सुवर्ण पदक हुकले.
अविनाश आणि अब्राहम किबिव्होट यांच्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत कमालीची चुरस होती. केनियाच्या दोन धावपटूंना मागे टाकून अविनाशने किबिव्होटला गाठले होते. अखेरच्या १०० मीटर अंतरावर मात्र किबीओटने वेग घेत साबळेला मागे टाकले. “माझी शेवटची लॅप निराशाजनक होती. परंतु, मला आनंद आहे की भारतासाठी मी पदक जिंकले,” अशी प्रतिक्रिया अविनाशने दिली.