ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज भारतीयांच्या चांगलाज ओळखीचा आहे. आतापर्यंत त्याने अनेकदा भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. स्टार्कची पत्नी अॅलिसा हिली ही सुद्धा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मिसेस स्टार्क सध्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत स्टार्क कुटुंबातील आणखी एक सदस्य सहभागी झाला आहे. त्याने भारतीय खेळासोबत स्पर्धा करून ऑस्ट्रेलियासाठी रौप्य पदकही जिंकले आहे.
मिचेल स्टार्कचा धाकटा भाऊ ब्रँडन स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून खेळतो. २८ वर्षीय ब्रँडन अॅथलेटिक्समध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. सध्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात ब्रँडन स्टार्कने २.२५ मीटरची सर्वोत्तम उडी मारत रौप्य पदक पटकावले. याच स्पर्धेत भारताच्या तेजस्वीन शंकरने कांस्यपदक जिंकले आहे.
ब्रँडन स्टार्कने २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता. जिथे तो उंच उडीच्या अंतिम फेरीत १५व्या स्थानावर राहिला होता. २०१८च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने २.३२ मीटर उडी मारून आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.