CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match Result : २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. त्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यावहिल्या टी २० सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम कांगारू संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे.

इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना झाला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९ षटकांमध्येच हे लक्ष्य पार केले. अॅशले गार्डनरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरे आणि वैयक्तीक पहिले टी २० अर्धशतक झळकावले. तिने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तिने अलाना किंगच्या साथीने भारताच्या हाती आलेला विजय हिसकावून नेला.

भारताच्यावतीने रेणूका सिंगने शानदार गोलंदाजी केली. मात्र, संघाला विजयी झालेले बघता आले नाही. रेणूकाशिवाय, दिप्ती शर्माने दोन आणि पदार्पण करणाऱ्या मेघना सिंगने एक बळी घेतला.

त्यापूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर स्मृती मंधानाने १७ चेंडूत २४ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, चौथ्या षटकात डार्सी ब्राउनने तिला बाद केले. भारताला दुसरा धक्का यास्तिका भाटियाच्या रूपात बसला. त्यानंतर शफाली वर्माने धडाकेबाज ४८ धावा फटकावल्या. अॅशले गार्डनरने १६व्या षटकात रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांना बाद करून भारताला दोन धक्के दिले. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनने सर्वाधिक चार बळी घेतले.

शेवटी, हरमनप्रीत कौरने शानदार खेळी करून भारताला १५४ धावांपर्यंत नेऊन ठेवले. कौरने ३४ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. यामध्ये आठ चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. हरमनप्रीतचे अर्धशतक ऐतिहासिक ठरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुठल्याही महिला क्रिकेटपटूचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. भारताचा पुढील सामना रविवारी (३१ जुलै) पाकिस्तानसोबत होणार आहे.

Story img Loader