CWG 2022 Ind Vs Pak T20 Cricket Match Result: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना रंगला. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना धमाकेदार अर्धशतकीय खेळी करून भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. पावसामुळे हा सामना १८-१८ षटकांचा झाला. भारताचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला आहे.
पाकिस्तानने भारताला विजयासाठी १८ षटकात १०० धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य दोन गड्यांच्या बदल्यात ११.४ षटकांमध्येच पूर्ण केले. भारताच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने डावाची आक्रमक सुरुवात केली. स्मृती मंधानाने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिने ४२ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६३ धावांची नाबाद खेळी केली.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असला की, दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. मात्र, भारतीय खेळाडूंनी हा दबाव सक्षमपणे सांभाळून खेळ केला. १२ व्या षटकामध्ये स्मृतीने उत्तुंग षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आजचा सामना जिंकून भारताने स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. भारताचा पुढील सामना बार्बाडोसशी होणार आहे.
पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी बिसमाहला या निर्णयावर पस्तावण्यास भार पाडले. ठराविक अंतराने पाकिस्ताचे गडी बाद होत गेले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ ९९ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. भारताकडून राधा यादव आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या डावात पाकिस्तानचे तीन खेळाडू धावबाद झाले.
हेही वाचा – ‘बॉक्सर का बेटा बॉक्सर नहीं वेटलिफ्टर बनेगा!’, जेरेमीने वडिलांचे स्वप्न उतरवले सत्यात
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना राष्ट्रकुल स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून, तर पाकिस्तानने बार्बाडोसकडून हार पत्करली होती. भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते. तसेच उभय संघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या १२ पैकी १० टी २० सामन्यांत भारताने विजय मिळवले आहेत.