CWG 2022 Ind Vs Pak T20 Cricket Match Updates in Marathi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना झाला. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद ६३ धावांची खेळी केली. हा सामना जिंकून भारताने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आणला. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा सर्व संघ अवघ्या ९९ धावांमध्ये गुंडाळला होता.
Commonwealth Games 2022 Updates, Ind W Vs Pak W 1st T20 Live : भारत विरुद्ध पाकिस्तान टी २० सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स
भारताने पाकिस्ताचा आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची तारांकित खेळाडू स्मृती मंधानाने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकले आहे. तिने केवळ ३१ चेंडूंमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.
शफाली वर्माच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला. तिने १६ धावा केल्या.
भारतीय सलामीवीरांनी पाचव्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली आहे. भारताच्या चार षटकांमध्ये बिनबाद ४१ धावा झाल्या आहेत. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा चौफेर फटकेबाजी करत आहेत.
पाकिस्तानने भारताला १०० धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानात उतरले आहेत.
भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा सर्व संघ अवघ्या ९९ धावांमध्ये गुंडाळला आहे.
भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून पाकिस्तानचे आठ गडी बाद केले आहेत. डावाचे शेवटचे षटक सुरू आहे.
कायनात इम्तियाजच्या रुपात पाकिस्तानचा सातवा गडी बाद झाला आहे.
पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली आहे. आलिया रियाझच्या रुपात त्यांचा सहावा गडी माघारी परतला आहे. पाकिस्तानच्या १७ षटकांमध्ये सहा बाद ९६ झाल्या आहेत.
पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव वाढताना दिसत आहे. त्यांच्या पाचवा गडी धावबाद झाला. १५ षटकांमध्ये पाकिस्तानच्या पाच बाद ८२ धावा झाल्या आहेत.
पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली असून चौथा गडी बाद झाला आहे. १२ षटकांमध्ये पाकिस्तानच्या चार बाद ६६ धावा झाल्या आहेत.
१० षटकांमध्ये पाकिस्तानच्या तीन बाद ६० धावा झाल्या आहेत. ओमायमा सोहेल आणि आयेशा नसीम खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
स्नेह राणाने एका षटकामध्ये दोन बळी मिळवून पाकिस्तानला संकटात टाकले आहे. मुनीबा अली ३२ धावा करून राणाच्या गोलंदाजीवर बाद झाली. पाकिस्तानच्या ९ षटकांमध्ये तीन बाद ५२ धावा झाल्या आहेत.
कर्णधार बिसमाह फारूफच्या रुपात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आहे. स्नेह राणाच्या गोलंदाजीवर ती पायचित झाली. पाकिस्तानच्या दोन बाद ५० धावा झाल्या आहेत.
पाकिसातनची यष्टीरक्षक मुनीबा अलीला आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाले. मेघना सिंगने तिचा झेल सोडला.
पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफने आक्रमक खेळ सुरू केला आहे. पाच षटकांमध्ये पाकिस्तानच्या एक बाद २६ धावा झाल्या आहेत.
पावसामुळे प्रत्येकी १८ षटकांचा सामना खेळवला जाणार आहे.
तीन षटकांमध्ये पाकिस्तानच्या एक बाद १२ धावा झाल्या आहेत.
पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर इरम जावेद शून्यावर बाद झाली आहे.
भारतीय महिला संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, सबभीनी मेघना, दीप्ती शर्मा, राधा यादव, मेघना सिंग, रेणुका सिंग.
पाकिस्तान महिला संघ: इरम जावेद, मुनीबा अली (यष्टीरक्षक), ओमायमा सोहेल, बिसमाह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन, कायनात इम्तियाज.
पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाऊस थांबला असला तरी मैदानावरील कव्हर्स अद्याप हटवलेले नाहीत. भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये खेळ सुरू होण्याची प्रतिक्षा करत आहेत.
एजबस्टनमध्ये पाऊस झाल्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे.