भारतीय टेबल टेनिसपटू जी साथियानने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष एकेरीमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. साथियान आणि इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल यांच्यामध्ये रोमहर्षक लढत झाली. मात्र, साथियानने चिवट झुंज देऊन ४-३ अशा फरकाने सामना जिंकला.

साथियानने दमदार सुरुवात केली आणि सलग तीन गेम जिंकले. पहिल्या तीन गेममध्ये त्याने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही. सामना आपल्या नावावर करण्‍यासाठी साथियानला आणखी एक गेम जिंकायचा होता पण ड्रिंकहॉलने सामन्यात पुनरागमन केले. त्याने सलग तीन गेम जिंकून सामना तीन-तीन असा बरोबरीत आणला. त्यामुळे सातवा गेम खेळवावा लागला. निर्णायक गेममध्ये साथियानने चांगला खेळ करून कांस्यपदक जिंकले.

या राष्ट्रकुल स्पर्धेतील साथियानचे हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी त्याने पुरुष दुहेरीमध्ये अचंता शरथ कमलसह रौप्य पदक जिंकले आहे. त्या लढतीत अचंता आणि साथियान जोडीला ड्रिंकहॉल आणि लियाम पिचफोर्ड जोडीने पराभूत केले होते.

हेही वाचा – CWG 2022: लक्ष्य सेन चमकला; बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण

अंचताने उपांत्य फेरीत ड्रिंकहॉल पराभव करून एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे इंग्लंडच्या ड्रिंकहॉलला साथियानविरुद्ध कांस्यपदकाचा सामना खेळावा लागला. त्यापूर्वी अचंताच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. साथियान या संघाचा देखील भाग होता.

Story img Loader