बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज (७ ऑगस्ट) महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवता जात आहे. एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर ही सुवर्ण पदकाची लढत आयोजित करण्यात आली आहे. या सामन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाने आपली एक खेळाडू करोना पॉझिटिव्ह असूनही तिला खेळण्यासाठी मैदानात उतरवले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या अंतिम सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ताहलिया मॅकग्राला करोनाची लागण झाल्याची पुष्टी केली. आश्चर्याची बाब म्हणजे तिला करोनाची लागण झाली असतानाही बोर्डाने तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.
एका क्रिकेट वेबसाईटने ताहलिया मॅकग्राचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमध्ये ती मास्क घालून फलंदाजीला जाण्यासाठी वाट बघताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ताहलिया मॅकग्रा संघातील खेळाडूंपासून दूर बसली आहे. अनेक प्रकारची खबरदारी घेऊन तिला ऑस्ट्रेलियाच्या संघात समाविष्ट केले आहे.”
सामन्यादरम्यानही इतर खेळाडू ताहलियापासून अंतर राखताना दिसले. जेव्हा तिने शेफाली वर्माचा झेल पकडला तेव्हा संघातील सहकारी तिच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी गेले नाहीत. मात्र, करोनाबाधित खेळाडूला मैदानात उतरवणे कितपत योग्य आहे, याबाबत सोशल मीडियावर या नाराजी व्यक्त होत आहे.