बर्मिंगहॅममध्ये २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंसाठी चांगला ठरला. भारतीय महिला हॉकी संघाने घाना ५-० असा शानदार पराभव केला. त्यानंतर बॅडमिंटन संघानेही आपला ‘जलवा’ दाखवला. भारतीय बॅडमिंटन संघाने मिश्र सांघिक स्पर्धेत पाकिस्तानचा ५-० असा पराभव केला. अलेक्झांडर स्टेडियमच्या ‘नॅशनल एक्झिबिशन’ केंद्रावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली.

एकेरी सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूने पाकिस्‍तानच्या महूर शहजादचा २१-७, २१-६ असा पराभव केला. त्यानंतर महिला दुहेरीमध्ये भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी शानदार खेळ केला. या दोघींनी महूर शहजाद आणि गजाला सिद्दिकी जोडीचा २१-४, २१-५ असा पराभव केला.

पुरुष दुहेरीत सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी मुहम्मद इरफान सईद भाटी आणि मुराद अली यांचा २१-१२, २१-९ असा पराभव केला. मिश्र दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्‍पा आणि बी सुमित रेड्डी या भारतीय जोडीने पाकिस्‍तानच्या मोहम्‍मद भाटी आणि गजाला सिद्दीकीचा पराभव केला.

हेही वाचा – CWG 2022 India vs Ghana Hockey: भारतीय महिला हॉकी संघाची धडाकेबाज सुरुवात; पहिल्याच सामन्यात घानाचा केला पराभव

तत्पूर्वी, पुरुष एकेरीमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मोहम्मद अलीचा २१-७, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही स्पर्धेतील सामना असेल, तर त्यात खेळाडूंवर खूप दडपण असते. पण, भारतीय बॅडमिंटनपटूंनी हे दडपण योग्य प्रकारे हाताळले.

Story img Loader