बर्मिंगहॅममध्ये २२वी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघाने पहिल्याच वर्षी अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केले आहे. आज (७ ऑगस्ट) एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर, सुवर्णपदकासाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात बलाढ्य मानला जातो. त्यामुळे भारतीय मुली कांगारूंचा सामना कशा पद्धतीने करणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.

सुवर्णपदकाची लढत एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी याच खेळपट्टीवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान कांस्य पदकाचा सामना होणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कसे रंग दाखवले, याबाबत अनिश्चितता आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत होते. त्यामुळे चेंडूला उसळी मिळत होती. अंतिम सामन्यासाठी देखील अशीच खेळपट्टी असावी, अशी आशा खेळाडूंना नक्कीच असेल.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारतीय मुलींना मिळणार आहे. भारताची सलामीची जोडी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सलामीवीर स्मृती मंधानाने आतापर्यंत दोन अर्धशतकं फटकावली आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय, कर्णधार हरमनप्रीत कौर, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकार यांची कामगिरीही मोलाची ठरणार आहे.

हेही वाचा – CWG 2022: इंग्लंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात स्मृती मंधानाचा ‘जलवा’; वेगवान अर्धशतक ठोकण्याचा केला विक्रम

ऑस्ट्रेलियच्या संघाचा विचार केला तर, मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वात संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक पराभव दिसलेला नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

संभाव्य भारतीय संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, मेघना सिंग, रेणुका सिंग

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ: अ‍ॅलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन