इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय पुरुष हॉकी संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या मजबूत स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने संघाच्या आनंदावर विरजन पडले. भारतीय हॉकी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या गोलकीपर पी श्रीजेशने उघडपणे आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
“आम्ही रौप्य पदक जिंकले नाही तर सुवर्णपदक गमावले आहे. हे निराशाजनक आहे. परंतु, राष्ट्रकुल खेळासारख्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे हीदेखील एक मोठी गोष्ट आहे. संघात अनेक तरुण खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी हा एक चांगला धडा असणार आहे. जर तुम्हाला पदके जिंकायची असतील तर तुम्हाला ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांना मागे टाकावे लागेल. त्यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल,” असे गोलकीपर श्रीजेश म्हणाला.
पुढे तो असेही म्हणाला, “संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून अंतिम सामन्यात पराभूत होण्याची माझी दुसरी वेळ आहे. त्यामुळे जास्त वाईट वाटत आहे.” श्रीजेशने सांगितले की, भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून धडा घेईल. पुढील वर्षी ओडिशामध्ये होणारा विश्वचषक आणि चीनमधील हांगझू येथे होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक चांगला खेळ करेल.
भारतीय पुरुष हॉकी संघ २०१०मधील दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हाही सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला होता. या स्पर्धेत हा संघ आतापर्यंत अपराजित राहिला होता.