बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सिंग खेळाडू आता रंगात आले आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताने आतापर्यंत पाच पदकं निश्चित केली आहेत. आज (४ ऑगस्ट) अमित पंघल आणि जास्मिन लांबोरिया यांनी चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. यापूर्वी, निखत झरीन, नीतू घंघस आणि हुसामुद्दीन मोहम्मद हेदेखील उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमितने आज (गुरुवार) पुरुषांच्या ५१ किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा ५-० असा पराभव केला. तर, जॅस्मिनने ६० किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा ४-१ असा पराभव केला. पहिल्या फेरीत अमित पंघलविरुद्ध पंचांनी दिलेला ९-१० असा निकाल वगळता या भारतीय बॉक्सरने प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. २६ वर्षीय अमितने यापूर्वी राऊंड १६ मध्येही ५-० असा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

अमित पंघल हा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर आहे. अमित व्यतिरिक्त सहा भारतीय पुरुष बॉक्सिंग खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ४९ किलो वजन असलेल्या मीराबाई चानूने ११३ किलो वजन कसे उचलले असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती

दरम्यान, २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदके जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. वेटलिफ्टिंगमध्ये दहा, ज्युदोमध्ये भारताला तीन तर लॉन बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि स्क्वॉशमध्ये भारताला एक पदक मिळाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 indian boxer amit panghal and jasmine lamboria secure medals enters into semi finals vkk