Cyclist Meenakshi Accident : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी (१ ऑगस्ट) या स्पर्धेचा चौथा दिवस होता. चार दिवसात याठिकाणी दोन अपघात झाले आहेत. दुसऱ्या अपघातामध्ये भारतीय साकलपटूचा समावेश आहे. शर्यत सुरू असताना भारतीय सायकलपटू मीनाक्षीचा अपघात झाला. या अपघातादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूची सायकल तिच्या अंगावरून गेली.
महिलांच्या १० किलो मीटर ‘स्केच रन’ स्पर्धे दरम्यान मीनाक्षीचा अपघात झाला. या अपघातात मीनाक्षी सायकलवरून घसरून ट्रॅकच्याकडेला पोहोचली. त्याचवेळी मागून येणारी न्यूझीलंडची सायकलपटू ब्रायोनी बोथा आपला वेग नियंत्रित करू शकली नाही. तिची सायकल मीनाक्षीच्या अंगावरून गेली. यानंतर बोथाही सायकलवरून खाली पडली.
अपघात होताच डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही सायकलपटूंना सामन्यातून स्पर्धेतून बाहेर नेले. मीनाक्षीला तेथून स्ट्रेचरवर नेण्यात आले. मीनाक्षीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरियाणाची रहिवासी असलेल्या मीनाक्षीने २०१९ मध्ये सायकल चालवण्यास सुरुवात केली होती. त्यावर्षी झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली होती. उत्कृष्ट कामगिरीमुळे मीनाक्षीची २०२० मध्ये भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली. यावर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सायकल ट्रॅकवर चार दिवसात दोन अपघात झाले आहेत. यापूर्वी इंग्लंडचा सायकलपटू मॅट वॉल्सही स्पर्धेदरम्यान खाली पडला होता. या अपघातात एक प्रेक्षकही जखमी झाला आहे. त्याच शर्यतीत भारताचा विश्वजित सिंगही सहभागी झाला होता. सुदैवाने तो अपघातातून बचावला होता.