बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडचा २-१ अशा फरकाने पराभव केला. तब्बल १६ वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले आहे. भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादग्रस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय महिला कांस्यपदकासाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरल्या होत्या.

निर्धारित ६० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी १-१ गोल केला होता. सलीमा टेटेने भारतासाठी पहिला गोल केला. तर, न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. तिथे भारतीय कर्णधार सविता पुनियाने शानदार गोलकीपिंग करत न्यूझीलंडचे चार प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे भारताला पदक जिंकण्यात यश आले.

भारतीय हॉकी संघाला तब्बल १६ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले आहे. भारताने २००२ मध्ये सुवर्ण आणि २००६ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. उपांत्य फेरीत भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-० असा पराभव झाला होता. कांस्य पदकाचा सामनाही पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. मात्र, यावेळी भारतीय संघाने कोणतीही चूक केली नाही.

हेही वाचा – CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने खेळाडूने रडत मागितली माफी! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तू…”

गट सामन्यांमध्ये भारताने घाना (५-०), वेल्स (३-१) आणि कॅनडाला (३-२) पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, तिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वादग्रस्त सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

Story img Loader