बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय ज्युदोपटूंची कमाल केली आहे. महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली.
सुशीला देवी लिकमाबामला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हाईटबोईकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विजय कुमार यादवने पुरुषांच्या ज्युदोमध्ये सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
सुशीलाने यापूर्वीही राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले आहे. २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी ज्युदोमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशीलाने भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.
टोकियो ऑलिंपिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणारी सुशीला ही एकमेव खेळाडू होती. सुशीला भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिला आपला आदर्श मानते.