भारतीय वेटलिफ्टिंगपटू अचिंत शिउलीने रविवारी रात्री उशिरा ३१३ किलो वजन उचलून बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अचिंतने स्नॅचमध्ये १४३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलून इतिहास रचला. त्याच्या कामगिरीमुळे भारताला वेटलिफ्टिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. अचिंतवरती सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, त्याचा इथपर्यंतचा संघर्ष थक्क करायला लावणारा आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत व्यासपीठावर तिरंगा फडकवणाऱ्या या २० वर्षीय तरुणाचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. २४ नोव्हेंबर २००१ रोजी पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील डुएलपूर येथे जन्मलेल्या अचिंताने बालपणी खूप संघर्ष केला आहे. त्याचे वडील सायकल रिक्षा चालवायचे. अचिंत आठव्या इयत्तेत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.
एवढेच नाही तर त्याचवेळी त्यांच्या पोल्ट्री फार्मवर जंगली कोल्ह्यांनी हल्ला केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची प्रचंड वाताहत झाली. कुटुंबातील प्रत्येकाला घरखर्चासाठी काम करावे लागत होते. त्याची आई कपडे शिवण्याचे काम करू लागली. स्वत: अचिंतने देखील साड्यांना जरीकाम आणि भरतकाम केलेले आहे.
अचिंतने वयाच्या दहाव्या वर्षापासून वेटलिफ्टिंगची तयारी सुरू केली. मोठा भाऊ आलोकसोबत तो जिममध्ये वेळ घालवत असे. विशेष म्हणजे अचिंतने भाऊ आलोककडून वेटलिफ्टिंग आणि शिवणकाम अशा दोन्ही गोष्टीही शिकल्या आहेत.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर अचिंत म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मी हे पदक जिंकले आहे. माझा भाऊ, आई, माझे प्रशिक्षक आणि सैन्यदलाच्या बलिदानामुळे मला हे पदक मिळाले आहे. ही माझ्या आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धा आहे. इथपर्यंत पोहोचण्यास मदत केलेल्या सर्वांचा मी ऋणी आहे. मी हे पदक माझे दिवंगत वडील, माझी आई, भाऊ आणि माझे प्रशिक्षक यांना समर्पित करू इच्छितो.”
अचिंतचा भाऊ आलोकने इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “आम्ही त्याला फारशी मदत करू शकलो नाही. जेव्हा तो नॅशनल खेळण्यासाठी गेला तेव्हा आम्ही त्याला फक्त ५०० रुपये दिले. त्याला खूप आनंद झाला होता. तो पुण्यात असताना ट्रेनिंगचा खर्च भागवण्यासाठी लोडिंग कंपनीत काम करायचा.”