येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने एक वक्तव्य केले आहे.
मिताली राजने गेल्या महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल आहे. सध्या ती तिच्या आयुष्यावरील ‘शाबाश मितू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानिमित्त कोलकात्यात असताना तिने भारतीय महिला संघ आणि आगामी राष्ट्रकुल स्पर्धांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मिताली म्हणाली, “मला वाटते की कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारी करणे खूप महत्वाचे आहे. चांगली तयारी आणि योग्य रणनीती घेऊन मैदानात उतरल्यास पदक जिंकण्याची चांगली संधी असते. आपल्या मुली तयारी करूनच मैदानात उतरतील.”
हेही वाचा – या आजीचा नादच खुळा! वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक
याशिवाय मितालीने हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “अष्टपैलू हरमनप्रीतकडे या खेळांमध्ये भारताला आघाडीवर नेण्याचा पुरेसा अनुभव आहे. ती २०१६पासून टी २० संघाचे नेतृत्व करत आहे.” हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने नुकताच श्रीलंकेला टी २० आणि एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.
हेही वाचा – ऋषभ पंतचा चेहरा वापरून धोनीने केली मैदानात घुसखोरी! सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
१९९८च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा ‘अ’ गटात समावेश झालेला आहे. भारताचा पहिला सामना २९ जुलैला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतासोबत अ गटामध्ये पाकिस्तान आणि बार्बाडोस हे देखील आहेत. क्रिकेटचा उपांत्य सामना ६ ऑगस्ट तर अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.