CWG 2022 Opening Ceremony Date, Time & Venue : गुरुवारी (२८ जुलै) २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आठ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ७२ देशांतील पाच हजारांहून अधिक खेळाडू पदकांसाठी झुंजताना दिसतील. पहिल्या दिवशी बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियमवर भव्यदिव्य उद्धघाटन सोहळा पार पडणार आहे. बर्मिंगहॅम आणि भारत यांच्यातील साडेचार तासांचा फरक लक्षात घेता, भारतीय प्रमाणवेळेनुसार २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी हा सोहळा सुरू होईल. या कार्यक्रमाला प्रिन्स चार्ल्स उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभात काही प्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. वेव्ह बँड डुरान डुरान, हेवी मेटल बँड ब्लॅक सब्बाथ आणि गिटार वादक टोनी इओमी आपली कला सादर करणार आहे. इओमी आणि नावाजलेले सॅक्सोफोनिस्ट सोवेटो किंच या कार्यक्रमात ‘हिअर माय व्हॉइस’ नावाचा ‘ड्रीम सीक्वेन्स’ सादर करतील. संपूर्ण वेस्ट मिडलँड्समधील १५ गटांतून निवडलेल्या ७०० हून अधिक गायकांचा एक गट देखील या कार्यक्रमात सहभागी होईल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला मोठा चमू पाठवला आहे. भारतीय खेळाडू १५ खेळांमधील विविध प्रकारांमध्ये भाग घेतील. तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजच्या कार्यक्रमामध्ये भारताची ध्वजवाहक असेल.
२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे च्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. सोनी नेटवर्कच्या – सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी टेन ४ आणि सोनी सिक्स या वाहिन्यांवर कार्यक्रम दिसेल. याशिवाय कार्यक्रमाचे लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप किंवा वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरही उद्घाटन समारंभाचे थेट प्रसारण होणार आहे.