राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. देशातील नागरिक आपल्या खेळाडूंचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील यात मागे नाहीत. त्यांनी वेळोवेळी सर्व पदक विजेत्या खेळाडूंसाठी शुभेच्छा संदेश असलेले ट्वीट केले आहेत. मात्र, त्यांच्या एका ट्वीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने भारतीय महिला कुस्तीपटूने रडत-रडत देशाची माफी मागितली. तिच्या या कृतीवरती पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू पूजा गहलोतने ५० किलो वजनी गटात खेळ केला. कुस्तीच्या उपांत्य फेरीत गहलोतने चांगला खेळ केला पण तिला सामना जिंकता आला नाही. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पूजाला अश्रू अनावर झाले. आपण देशासाठी सुवर्णपदक जिंकू शकलो नाही, याबाबत तिने जाहीरपणे माफी मागितली.
“सुवर्णपदक जिंकून भारताचे राष्ट्रगीत येथे वाजवण्याची माझी इच्छा होती. परंतु, ती फक्त एक कांस्य पदक जिंकू शकले. त्याबद्दल मी माफी मागते,” असे पूजा म्हणाली. तिचा हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचला.
पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाचे ट्विटरवरून सांत्वन केले आहे. “पूजा, तू मिळवलेले पदक आनंद साजरा करण्यासारखी बाब आहे, माफी मागण्याची नाही. तुझा जीवनाचा प्रवास आम्हाला प्रेरणा देतो. तुझ्या यशामुळे आम्हाला आनंद झाला आहे. भविष्यात तू देशासाठी आणखी चांगली कामगिरी करशील,” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.