२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मैदानी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. धावपटू हिमा दासने उपांत्य फेरीत तर मंजू बाला हिने हातोडा फेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला आणखी दोन पदके मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारताची तारांकित धावपटू हिमा दासने २३.४३ सेकंदांची वेळ नोंदवत महिलांच्या २०० मीटर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. २२वर्षीय हिमाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. झांबियाच्या ऱ्होडा जोब्वूने २३.८५ सेकंदांचा वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले तर युगांडाच्या जेसेंट न्यामहुंगेने २४.०७ च्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

दरम्यान, महिलांच्या हातोडा फेक प्रकारात भारताच्या मंजू बालाने अंतिम फेरी गाठली आहे. तिच्यासोबत असणाऱ्या सरिता सिंगला मात्र, खराब कामगिरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 33 वर्षीय बालाने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ५९.६८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह ११वे स्थान पटकावले. सरिता १३व्या स्थानावर राहिल्याने तिला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.

हेही वाचा – CWG 2022: पाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारताच्या मीराबाईकडून मिळाली प्रेरणा

नियमांनुसार, सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. हातोडा फेकीची अंतिम फेरी शनिवारी (६ ऑगस्ट) रोजी होणार आहे. कॅनडाच्या कॅमरीन रॉजर्सने ७४.६८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविले. तिच्या कामगिरीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रम नोंदवला गेला आहे.

Story img Loader