ट्रॅप नेमबाज क्यान चेनाईने दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेद्वारे रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली आहे. मात्र चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकप्राप्त विजय कुमारचे ऑलिम्पिकवारीचे स्वप्न भंगले आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा क्यान दहावा नेमबाज ठरला आहे.
२६ वर्षीय क्यानने वाढदिवसाच्या एक दिवस आधी ट्रॅप प्रकारात १२० गुणांसह चौथे स्थान मिळवले. याप्रकारात चार जणांना संधी होती. अंतिम फेरीत क्यान व अन्य तिघांच्या गुणांची बरोबरी झाली. उपांत्य फेरीतील प्रवेशासह क्यानची ऑलिम्पिकवारी पक्की झाली. अब्दुलरहमान अल फैहानने सुवर्ण तर तैपेईच्या यांग क्युन पीने रौप्यपदक मिळवले. कांस्यपदकाच्या मुकाबल्यात कुवैतच्या तलाल अल रशीदीने बाजी मारली.
क्यानने या यशाचे श्रेय आईवडील व अव्वल नेमबाज मानवजीत सिंग संधू यांना दिले. महिनाभरापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत क्यानचे वडील दारियुस चेनाई यांनी सुवर्णपदक पटकावले होते.

दडपण बाजूला सारणे हेच मोठे आव्हान होते. अन्य गोष्टी विसरून क्षमतेनुरूप सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा सल्ला वडिलांनी दिला. घरच्या मैदानावर नेमबाजी करणे कठीण आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने प्रचंड आनंद झाला आहे.
– क्यान चेनाई, नेमबाज

Story img Loader