रघुनंदन गोखले
ग्रँडमास्टर डी. गुकेशने भारतीयांच्या अपेक्षेप्रमाणे ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकली आणि जागतिक बुद्धिबळाच्या इतिहासात आपले नाव जगज्जेत्याचा सर्वात लहान आव्हानवीर म्हणून सुवर्णाक्षराने नोंदवले. वयाच्या १५व्या वर्षी ‘कँडिडेट्स’ खेळणाऱ्या बॉबी फिशरला आव्हानवीर बनण्यासाठी त्यानंतर १४ वर्षे थांबावे लागले होते, तर गॅरी कास्पारोव किंवा मॅग्नस कार्लसन यांसारख्या दिग्गजांनाही आपली विशी ओलांडावी लागली.
मॅग्नसकडून कौतुक
आजचा जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन स्पर्धेच्या आधी म्हणाला होता की, जर कोणी भारतीय स्पर्धा जिंकला तर तो मोठा धक्काच असेल. गुकेशने त्याला दिलेल्या धक्क्यातून सावरताना मॅग्नसने युवा भारतीय खेळाडूच्या खेळाची स्तुती केली. विशेषत: या माजी जगज्जेत्याला गुकेशची हिकारू नाकामुराविरुद्धची अकरावी खेळी फारच भावली. या खेळीमुळे गुकेशच्या मोहऱ्यांना मोकळीक मिळाली आणि नाकामुराच्या मोहऱ्यांना हवा तसा हल्ला करता आला नाही. क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाकामुराने तब्बल ७१ खेळया अपार प्रयत्न केले, पण जगज्जेतेपदाच्या उंबरठयावर पोहोचलेल्या गुकेशचा अभेद्य बचाव त्याला भेदता आला नाही. त्यानंतर सर्वाचे लक्ष लागले होते, ते कारुआना विरुद्ध नेपोम्नियाशी यांच्यातील संघर्षांकडे. जो विजयी होईल तो गुकेशविरुद्ध अजिंक्यपदासाठी जलदगती ‘टायब्रेकर’ खेळणार होता. ‘‘त्यांचा सामना बरोबरीत सुटेपर्यंतची पंधरा मिनिटे माझ्या आयुष्यातील सर्वात मानसिक दडपणाची असावीत,’’ असे गुकेश म्हणाला.
हेही वाचा >>> गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
नेपोची गुकेशला अप्रत्यक्ष मदत
तिकडे कारुआना विरुद्ध नेपोम्नियाशी संघर्ष टिपेला पोहोचला होता. अग्रमानांकित कारुआना सहज जिंकेल अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. परंतु रशियन नेपोम्नियाशीने अमेरिकन कारुआनाच्या वेळेच्या कमतरतेचा फायदा घेत आपला अपराजित राहण्याचा विक्रम अबाधित राखला. प्रज्ञानंदने आबासोवला पराभूत केले आणि त्याच्या बहिणीने, वैशालीने आपला सलग पाचवा विजय नोंदवताना असंख्य वेळा जागतिक जलदगती विजेती राहिलेल्या कॅटेरिना लायनोला पराभूत केले. कोनेरू हम्पीने ले टिंगजीला काळया मोहऱ्यांनी हरवताना दुसरा क्रमांक पटकावला.
आता लक्ष भारत-चीन युद्धाकडे
आता जगभरातील बुद्धिबळप्रेमी वाट बघत आहेत ती भारत-चीन संघर्षांची! फक्त हे युद्ध होणार आहे ६४ घरांच्या पटावर! चिनी विश्वविजेता डिंग लिरेन त्याच्याहून १४ वर्षांनी लहान असलेल्या ताज्या दमाच्या गुकेशविरुद्ध कसा खेळतो याचीच उत्सुकता सर्वांना आहे. आणि जर हा सामना भारतात झाला तर इथे बुद्धिबळ ज्वर टिपेला पोहोचेल. १७ वर्षांच्या गुकेशला तमिळनाडू सरकार यथायोग्य गौरवीत करेलच, पण भारत सरकार कसे गौरवते ते बघणे औत्सुक्याचे ठरेल, कारण अजूनपर्यंत अर्जुन पुरस्कारासाठीही सरकारने त्याचा विचार केलेला नाही. अचानक गुकेशला खेलरत्न पुरस्कार मिळाला, तर अर्जुन पुरस्काराआधी खेलरत्न मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल आणि वयाने
सर्वात लहानही!
(लेखक बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)