Candidates Chess : भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तसेच डी. गुकेश ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ही स्पर्धा जिंकून त्याने जगज्जेत्या डिंग लिरेनला (चिनी ग्रँडमास्टर) आव्हान दिलं आहे. यावर्षीच्या अखेरीस डी. गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सामना खेळवला जाईल. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी ही स्पर्धा (कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट) आयोजित केली जाते. डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराविरोधातील अंतिम सामना अनिर्णित राखला. स्पर्धेत तो १४ पैकी ९ गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. यासह त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली असून तीन दशकांपासूनचा रशियन बुद्धीबळपटू कास्परोव्हचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. १९८४ च्या कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत रशियन ग्रँडमास्टर कास्परोव्हने वयाच्या २२ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळची स्पर्धा जिंकून कास्परोव्हने त्याचाच देशबांधव जगज्जेत्या कारपोव्हला आव्हान दिलं होतं.

दरम्यान, या विजयानंतर गुकेश म्हणाला, मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोनिआचमधील रोमांचक सामना पाहत होतो. त्याचा मला अंतिम सामन्यात फायदा झाला.

पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदने कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणाऱ्या गुकेशची पाठ थोपटली आहे. आनंदने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर गुकेशच्या अभिनंदनाची पोस्ट लिहिली आहे. यामध्ये आनंदने म्हटलं आहे की, सर्वात युवा चॅलेंजर बनल्याबद्दल डी. गुकेशचं अभिनंदन. तू जे काही साध्य केलं आहेस त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कठीण प्रसंगी तू कसा खेळलास, अवघड प्रसंग कसे हाताळलेस ते पाहून मला तुझा अभिमान वाटतो. तू आता या खास क्षणाचा आनंद घे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D gukesh won chess candidates 2024 makes history by becoming youngest ever world championship contender asc
Show comments