D Gukesh World Championship prize money : भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. हा पराक्रम करणारा गुकेश सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. गुरुवारी १४व्या आणि अंतिम डावात गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला पराभूत केलं. यानंतर वयाच्या १८व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. या कामगिरीनंतर जगभरात त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुकेशच्या आधी सर्वात तरूण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असण्याचा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या २२ वर्षी १९८५ मध्ये अॅनातोली कार्पोव्ह यांचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती. कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर गुकेश ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. पाच वेळा जागतिक विजेतेपद जिंकणाऱ्या आनंद यांनी २०१३ मध्ये अखेरची ही स्पर्धा जिंकली होती.

गुकेशला किती बक्षीस मिळालं?

या ऐतिहासिक विजयनंतर गुकेशला २.५ दशलक्ष बक्षीस पर्समधून तब्बल १.३ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ११.०३ कोटी रुपये) इतकी बक्षीसाची रक्कम मिळाली. बुद्धिबळची आंतरराष्ट्रीय संघटना FIDE च्या नियमांनुसार, अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी २० हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.६९ कोटी रुपये मिळतात. तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाते.

डी गुकेशने चॅम्पियनशिपमध्ये तीन सामने जिंकले होते. त्याने तिसरा, ११वा आणि शेवटचा सामना जिंकला. यासाठी त्याला ६० हजार डॉलर म्हणजेच ५.०७ कोटी रुपये मिळाले. तर लिरेनने दोन सामने जिंकले आहेत ज्यासाठी त्याला ३.३८ कोटी रुपये मिळाले आहेत. उरलेली रक्कम दोघांमध्ये समान प्रमाणात विभागली गेली. म्हणजेच गुकेशला एकूण १.३५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११.४५ कोटी रुपये तर लिरेनला १.१५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ९.७५ कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा>> D Gukesh : गुकेशच्या जगज्जेतेपदाचं धोनी कनेक्शन! क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाने केली मदत

IPLच्या तुलनेत गुकेशला मिळालेली रक्कम किती?

जरी गुकेश जागतिक चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जरी त्याला ११.४५ कोटी रुपये बक्षीस मिळाले असले तरी आयपीएल २०२५ च्या लिलावात काही खेळाडूंना मिळालेल्या रकमेपेक्षा ती बरीच कमी आहे. गेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये झालेल्या आयपीएल लिलावात, १३ क्रिकेटपटूंना गुकेशच्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.

आयपीएल लिलावामध्ये सर्वाधिक किंमत मिळालेल्या रिषभ पंत याला गुकेशला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा २.५ पट अधिक पैसे मिळाले आहेत. या लिलावात पंतला २७ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम आयपीएल लिलावाच्या इतिहासात एखाद्या खेळाडूला मिळालेली सर्वाधिक मोठी किंमत आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्स या संघाने विकत घेतले आहे.

मात्र गुकेशचा विजय हा बक्षिसाच्या रकमेच्या तुलनेत मोजणे शक्य नाही. त्याच्या या विजयाने जगज्जेतेपदाचा मुकुट भारताकडे परत आला आहे. तसेच गुकेशच्या विजयामुळे भारतात बुद्धिबळ खेळणारे खेळाडू आणि त्याभोवतीचे अर्थकारण बदलण्यास मदत मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D gukesh world championship prize money is less than half of rishabh pant ipl auction price check details marathi news rak