पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या रूपात धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या स्टेन दुखापतग्रस्त असून दुसऱ्या सामन्याच्या दोन दिवसांआधी त्याची तंदुरुस्त चाचणी घेण्यात येणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी स्टेनबद्दल संदिग्धता असली त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमीही आहे. वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल आणि जेपी डय़ुमिनी पूर्णपणे तंदुरुस्त असून ते दुसऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे.
डय़ुमिनीच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती, तर मॉर्केलच्या मांडीतील स्नायू दुखावले होते. त्यामुळे या दोघांनाही दौऱ्यातील काही सामन्यांना मुकावे लागले होते. स्टेनच्या मांडीच्या सांध्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.
‘‘दोन दिवसांपूर्वी डय़ुमिनीच्या हातावरील टाके काढण्यात आले आहेत. त्यानंतर त्याने सरावही केला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मॉर्केलही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला आहे. स्टेनची दुखापत किती गंभीर स्वरूपाची आहे, हे अजूनही समजू शकलेले नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी त्याची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल,’’ असे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे डॉक्टर मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले.