जागतिक क्रिकेटमधील आकडय़ांवर आणि विक्रमांवर अधिराज्य गाजविणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची द्विशतकी कसोटी भारतात होणार हे रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतच स्पष्ट झाले आहे. परंतु सचिनच्या दोनशेव्या सामन्याच्या यजमानपदाचे भाग्य कोणाला लाभणार हे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या या मालिकेतील दोन कसोटी सामने अनुक्रमे मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये होणार आहेत. सचिनची दोनशेवी कसोटी घरच्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने वानखेडे स्टेडियमवर व्हावी, अशी मुंबईकरांची इच्छा आहे, तर बंगाल क्रिकेट असोसिएशनसुद्धा सचिनच्या ऐतिहासिक क्षणाचे यजमानपद भूषविण्यासाठी उत्सुक आहेत. याचप्रमाणे दोनशेव्या सामन्यानिशी सचिन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार अशीही चर्चा रंगत असल्यामुळे या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई आणि कोलकातामधील रस्सीखेचीमध्ये कोण जिंकणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. पण बीसीसीआयच्या २८ सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत जगमोहन दालमिया अध्यक्षपदावर विराजमान असल्यामुळे ते बंगालवासीयांना नाराज करणार नाहीत, अशी चर्चा आहे.
सचिनच्या खात्यावर सध्या १९८ कसोटी सामने जमा आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेत तो आपल्या कारकीर्दीतील दोनशेवी कसोटी खेळणार असा अंदाज आधी वर्तवण्यात येत होता. परंतु रविवारी बीसीसीआयने नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजला संघाला भारतात येण्याचे आमंत्रण देताना दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची योजना आखली आहे. त्यामुळे सचिनची दोनशेवी कसोटी भारतातच खेळणार हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले की, ‘‘वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून लवकरच भारत दौऱ्याबाबत मंजुरी येईल. रोटेशन पॉलिसीनुसार कसोटी सामन्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येते. त्यामुळे हा सामना मुंबईतच येईल, हे सांगता येणे कठीण आहे.’’
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची दौरा आणि कार्यक्रम आखणी समिती या मालिकेतील सामन्यांच्या तारखा आणि स्थळ निश्चित करेल. येत्या काही दिवसांमध्ये या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. परंतु २८ सप्टेंबपर्यंत दालमिया यांच्याकडेच बीसीसीआयच्या सूत्रे असल्यामुळे मुंबईकरांना १९९वा तर कोलकातावासीयांना २००वा सामना वाटय़ाला येण्याची दाट शक्यता क्रिकेटवर्तुळात वर्तवण्यात येत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन सचिनच्या ऐतिहासिक सामन्याच्या यजमानपदासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे समजते.
दालमिया मुंबईऐवजी कोलकाताला यजमानपदासाठी कौल देण्याची शक्यता आहे, यासाठी आणखी एक कारण आहे. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाचा सामना ईडन गार्डन्सला होणार होता. परंतु स्टेडियमच्या नूतनीकरणाचे कार्य पूर्ण न झाल्यामुळे तो सामना बंगळुरूला हलविण्यात आला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)च्या अध्यक्षपदावर शरद पवार विराजमान होते, तर शशांक मनोहर बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर होते. बंगाल क्रिकेट असोसिएशनने प्रयत्न करूनही भारत-इंग्लंड सामना त्यांना गमवावा लागला होता. पवार यांनी मनावर घेतले असते तर बंगालवासीयांना निराश व्हावे लागले नसते. नेमक्या याच गोष्टीचा वचपा काढण्याच्या हेतूने दालमिया सचिनच्या दोनशेव्या कसोटीचे यजमानपद बंगालला मिळवून देण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावू शकतील, असे सूत्रांकडून समजते.
दालमियांचा कौल वानखेडेऐवजी ईडन गार्डन्सकडे?
जागतिक क्रिकेटमधील आकडय़ांवर आणि विक्रमांवर अधिराज्य गाजविणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची द्विशतकी कसोटी भारतात होणार हे रविवारी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-09-2013 at 03:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalmia favors eden garden instead wankhede for sachins 200 test math