मेलबर्न : गतउपविजेत्या डॅनिल मेदवेदेवचे ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तब्बल चार आणि ४८ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत पाचव्या मानांकित मेदवेदेवला बिगरमानांकित अमेरिकेच्या लर्नर टिएनने पाच सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. दुसरीकडे, गतविजेता यानिक सिन्नेरने पुरुषांत, तर दुसऱ्या मानांकित इगा श्वीऑटेकने महिलांमध्ये तिसरी फेरी गाठली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या मेदवेदेवने यंदा मात्र निराशा केली. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात १९ वर्षीय टिएनने मेदवेदेवला ६-३, ७-६ (७-४), ६-७ (८-१०), १-६, ७-६ (१०-७) असे पराभूत केले. स्थानिक वेळेनुसार हा सामना रात्री तीनच्या सुमारास संपला.

टिएनला मुख्य स्पर्धेत खेळण्यापूर्वी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागला होता. त्यानंतर त्याने मुख्य स्पर्धेत सलग दोन लढतीही जिंकल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेची तिसरी फेरी गाठणारा तो पीट सॅम्प्रसनंतरचा (१९९०) सर्वांत युवा अमेरिकन टेनिसपटू ठरला आहे. जागतिक क्रमवारीत १२१व्या स्थानी असणाऱ्या टिएनने यंदाच्या स्पर्धेपूर्वी एकही ग्रँडस्लॅम सामना जिंकला नव्हता.

हेही वाचा >>> Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे

दुसरीकडे,अग्रमानांकित इटलीच्या यानिक सिन्नेरला दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करताना संघर्ष करावा लागला. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेटने सिन्नेरला चार सेटपर्यंत झुंजवले. मात्र, अखेरीस सिन्नेरने ४-६, ६-४, ६-१, ६-३ अशी बाजी मारली.

पुरुष एकेरीतील अन्य लढतीत १३व्या मानांकित नॉर्वेच्या होल्गर रूनने इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीला ७-६ (७-३), २-६, ६-३, ७-६ (८-६) असे नमवले. १७व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोला दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली. हंगेरीच्या बिगरमानांकित फॅबिएन मारोझसानने टिआफोवर ६-७ (३-७), ६-४, ३-६, ६-४, ६-१ अशी मात केली.

महिला एकेरीत पोलंडच्या इगा श्वीऑटेकने घोडदौड कायम राखली. तिने स्लोव्हाकियाच्या रेबेका स्रामकोवाला ६-०, ६-२ असे सहज पराभूत केले. पुढच्या फेरीत तिच्यासमोर माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ब्रिटनच्या एमा रॅडुकानूचे आव्हान असेल. माजी विम्बल्डन विजेत्या एलिना रायबाकिनानेही दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करताना अमेरिकेच्या इवा योविचचा ६-०, ६-३ असा पराभव केला.

बालाजी-वारेलाची विजयी सुरुवात

भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मॅक्सिकन जोडीदार मिग्वाइल अँजेल रेयेस-वारेला यांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत बालाजी-वारेला जोडीने रॉबिन हास आणि अॅलेक्झांडर नेदोव्हीसोव जोडीवर ६-४, ६-३ अशी मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daniil medvedev defeat in 2nd round of australian open 2025 zws