Danish Kaneria says Sanju Samson needs to score: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की, ऋषभ पंत आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंसोबतच्या खडतर स्पर्धेमुळे त्याला टीम इंडियामध्ये जास्त संधी मिळू शकल्या नाहीत. ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकला नाही. प्रतिभा दाखवू शकत नाही. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाचा असा विश्वास आहे की, सॅमसनला पुरेशा संधी मिळाल्या आहेत. पण तरीही तो टीम इंडियासाठी मोठी धावसंख्या करू शकलेला नाही.
भारतीय क्रिकेट चाहत्यांप्रमाणे कनेरियाही सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे निराश झाला आहे. कनेरिया म्हणाला की, राजस्थान रॉयल्सच्या प्रतिभावान कर्णधाराने नियमितपणे धावा काढण्याची वेळ आली आहे. कनेरियाने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे, कारण काही खेळाडूंना पुरेशा संधी दिल्या जात नसल्याची तक्रार केली जात होती. आता भारताने त्यांना संधी दिली आहे, संजू सॅमसन, तू धावा कधी करणार?”
दानिश कनेरिया पुढे म्हणाला, “त्याच्याकडे आता पुरेशा संधी आहेत. मी अशा लोकांपैकी एक होतो, ज्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्याला संधी मिळत राहावी अशी माझी इच्छा होती. मात्र, त्याने या संधींचा फायदा उठवला नाही.” संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात केवळ १९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने पहिल्या सामन्यात १२, दुसऱ्या सामन्यात ७ धावा केल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
भारतीय संघ व्यवस्थापन आगामी विश्वचषकापूर्वी संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण दुखापतग्रस्त फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय अपडेटनुसार, दोन्ही खेळाडूंनी नेटवर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, तर राहुलही यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसला, पण तरीही हे दोन्ही खेळाडू आशिया चषक किंवा विश्वचषक स्पर्धेत खेळतील याची शंभर टक्के खात्री नाही.
हेही वाचा – Fire: ईडन गार्डन्स स्टेडियमला लागली आग, ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले सामान जळून खाक
दरम्यान, आयएएनएसला संबंधित सूत्रांनी सांगितले की, यष्टीरक्षक-फलंदाज राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये खेळण्याच्या त्याच्या आशा वाढल्या आहेत.सूत्राने आयएएनएसला सांगितले, “तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि भारतीय संघाच्या आगामी सामन्यांसाठी तो उपलब्ध होऊ शकतो. यापूर्वी, लोकांनी सांगितले होते की तो नेटमध्ये पुन्हा फलंदाजी सुरू करण्याच्या जवळ नाही, परंतु त्याच दिवशी तो फलंदाजी करताना दिसला. तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि कदाचित तो आता उपलब्ध होईल.”