श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुणतिलकावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले आहे. म्हणजेच यापुढे बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला आहे.
श्रीलंका क्रिकेटने या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “दनुष्का गुणतिलका याने ऑस्ट्रेलियातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर आणि त्याच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने निर्णय घेतला आहे की ती कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये निवडीसाठी पात्र नसावा.” या आरोपाची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असेही ते पुढे म्हटले आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण
सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुणतिलकाला अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर गुणतिलकाला सिडनी पोलिसांनी टीम हॉटेलमधून अटक केली होती. सध्या गुणतिलका सिडनीत आहेत, तर श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला परतला आहे.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या संभाषणानंतर दोघांची भेट झाली. २ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना ‘रोझ बे’ या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ३१ वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली.