पंखात उंच भरारी घेण्याचे बळ असले की पक्षी गरुडभरारीही घेऊ शकतो. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोलंबियाने हे सिद्ध करून दाखवले आहे. ९०च्या दशकात अव्वल खेळाडू असतानाही कामगिरीबाबत कायम प्रश्नचिन्ह असलेला कोलंबियाचा संघ गेल्या १८ महिन्यांत गरुडभरारी घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच भरारी घेत कोलंबियाने फिफा क्रमवारीत इंग्लंड, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, अर्जेटिना आणि ब्राझील यांसारख्या दादा संघांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भक्कम बचाव आणि जगातील सर्वोत्तम आक्रमण यामुळे कोलंबियाचा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जात आहे.
२००२ ते २०१० दरम्यान फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होता न आल्यामुळे फुटबॉलच्या या महासंग्रामात खेळण्यासाठी कोलंबियाला १६ वर्षे वाट पाहावी लागली असली तरी हा संघ अनुभवी मानला जात आहे. कोलंबिया संघातील प्रत्येक खेळाडूला किमान १५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. विविध व्यूहरचनांमुळे गेल्या काही महिन्यांत आश्चर्यकारक निकाल मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक जोस पेकेरमन यांनी कोलंबिया संघाला ओळख मिळवून दिली आहे. पात्रता फेरीत अर्जेटिनाविरुद्ध बरोबरी राखत उरुग्वे आणि चिली संघांवर विजय मिळवून पेकेरमन यांनी आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. युरोपीयन फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू असलेले रादामेल फलकाव आणि जेम्स रॉड्रिगेझ यांच्यावर कोलंबियाची भिस्त असणार आहे. टेओफिलो गुटिरेझ हा कोलंबियासाठी हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. बचावफळीतील रॉड्रिगेझ आणि जुआन कुआड्राडो हे गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात पटाईत आहेत. जॅक्सन मार्टिनेझ हा प्रतिस्पध्र्याच्या बचावफळीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर फिफा विश्वचषकात खेळत असल्यामुळे दडपणाचा सामना करत कोलंबियाला आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी लागणार आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
युरोपीयन फुटबॉलमधील महागडय़ा खेळाडूंमध्ये गणले जाणारे रादामेल फलकाव आणि जेम्स रॉड्रिगेझ यांनी या मोसमात जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या फलकावने युरोपमध्ये तब्बल १५१ गोल लगावले आहेत. गोल करण्यातील अचूकता, कल्पकता तसेच दैवी देणगी लाभलेल्या जेम्स रॉड्रिगेझमध्ये अफाट गुणवत्ता आहे. ब्राझीलमधील वातावरण कोलंबियासाठी पोषक आहे. आक्रमण ही कोलंबियाची जमेची बाजू असली तरी गोलरक्षकाचा अनुभव त्यांच्यासाठी मारक ठरणार आहे. बचावपटूंचे वय हासुद्धा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मारियो येपेस आणि लुइस अरामांटो हे दोन दिग्गज बचावपटू त्यांच्याकडे असले तरी त्यांना पस्तिशी गाठली आहे. फलकावला जानेवारी महिन्यात झालेली दुखापत कोलंबियाचा विश्वचषकातील प्रवास धोक्यात आणू शकतो. पात्रता फेरीत कोलंबियाने केलेल्या गोलपैकी एक तृतीयांश गोल फलकावने केले असल्यामुळे त्याचा सहभाग कोलंबियासाठी महत्त्वाचा आहे.

अपेक्षित कामगिरी
‘क’ गटात ग्रीस, जपान आणि आयव्हरी कोस्ट या तुल्यबळ संघांचा समावेश असल्यामुळे फलकावच्या अनुपस्थितीतही कोलंबिया संघ बाद फेरीपर्यंत वाटचाल करू शकतो. सध्याची कामगिरी पाहता, क गटात कोलंबिया अव्वल स्थान पटकावेल, यात कोणतीही शंका नाही. मात्र बाद फेरीत ‘ड’ गटातून पहिल्या दोन क्रमांकांवर अपेक्षित असणाऱ्या उरुग्वे आणि इंग्लंड या बलाढय़ संघांचा सामना करायचा असल्यामुळे कोलंबियाचे आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे. ‘चोकर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडवर किंवा स्टार खेळाडूंचा अभाव असलेल्या उरुग्वेसारख्या संघावर विजय मिळवून कोलंबियाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले तरी ब्राझीलसारखा मातब्बर संघ त्यांच्या प्रवासात अडसर बनून उभा ठाकणार आहे. त्यामुळे कोलंबियाची घोडदौड उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मर्यादित असणार आहे.
* फिफा क्रमवारीतील स्थान :
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ५ वेळा (२०१४ सह)
* अंतिम सोळामध्ये : १९९०

संभाव्य संघ
गोलरक्षक : डेव्हिड ओस्पिना, फर्ड मोंड्रागोन, कॅमिलो वर्गास. बचावफळी : मारियो येपेस, ख्रिस्तियान झपाटा, पाबलो आर्मेरो, लुइस पेरिआ, सान्तिआगो एरिआस, ईडेर बलान्टा, स्टीफन मेडिना. मधली फळी : अबेल अगिलार, जुआन कॅमिलो झुनिगा, जुआन कुआड्राडो, जुआन क्विंटेरो, अल्डो लिओ रामिरेझ, कार्लोस सांचेझ, फ्रेडी गुआरिन, जेम्स रॉड्रिगेझ. आघाडीवीर : विक्टर इबाबरे, लुइस मुरियल, कार्लोस बाका, जॅक्सन मार्टिनेझ, रादामेल फलकाव.
स्टार खेळाडू : रादामेल फलकाव, जेम्स रॉड्रिगेझ, लुइस मुरियल, जॅक्सन मार्टिनेझ.
* व्यूहरचना : ४-४-२, ४-२-२-२ किंवा ४-२-३-१

Story img Loader