पंखात उंच भरारी घेण्याचे बळ असले की पक्षी गरुडभरारीही घेऊ शकतो. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोलंबियाने हे सिद्ध करून दाखवले आहे. ९०च्या दशकात अव्वल खेळाडू असतानाही कामगिरीबाबत कायम प्रश्नचिन्ह असलेला कोलंबियाचा संघ गेल्या १८ महिन्यांत गरुडभरारी घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच भरारी घेत कोलंबियाने फिफा क्रमवारीत इंग्लंड, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, अर्जेटिना आणि ब्राझील यांसारख्या दादा संघांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भक्कम बचाव आणि जगातील सर्वोत्तम आक्रमण यामुळे कोलंबियाचा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जात आहे.
२००२ ते २०१० दरम्यान फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होता न आल्यामुळे फुटबॉलच्या या महासंग्रामात खेळण्यासाठी कोलंबियाला १६ वर्षे वाट पाहावी लागली असली तरी हा संघ अनुभवी मानला जात आहे. कोलंबिया संघातील प्रत्येक खेळाडूला किमान १५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. विविध व्यूहरचनांमुळे गेल्या काही महिन्यांत आश्चर्यकारक निकाल मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक जोस पेकेरमन यांनी कोलंबिया संघाला ओळख मिळवून दिली आहे. पात्रता फेरीत अर्जेटिनाविरुद्ध बरोबरी राखत उरुग्वे आणि चिली संघांवर विजय मिळवून पेकेरमन यांनी आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. युरोपीयन फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू असलेले रादामेल फलकाव आणि जेम्स रॉड्रिगेझ यांच्यावर कोलंबियाची भिस्त असणार आहे. टेओफिलो गुटिरेझ हा कोलंबियासाठी हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. बचावफळीतील रॉड्रिगेझ आणि जुआन कुआड्राडो हे गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात पटाईत आहेत. जॅक्सन मार्टिनेझ हा प्रतिस्पध्र्याच्या बचावफळीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर फिफा विश्वचषकात खेळत असल्यामुळे दडपणाचा सामना करत कोलंबियाला आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा