Dattajirao Gaekwad Death : भारतातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे मंगळवारी गुजरातमधील वडोदरा येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गायकवाड यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अंशुमन गायकवाड आहे. अंशुमन गायकवाडही भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दत्ताजीराव गायकवाड हे १९५७-५८ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने वडोदरा येथील मोतीबाग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघाचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला होता.
गायकवाड हे भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सी. एस नायडू यांचे विद्यार्थी होते. १९८४ मध्ये बडोद्याच्या महाराजांनी युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सी.एस. नायडू यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी, गायकवाड १२ वर्षांचे होते आणि बडोद्यात भारताचे माजी कर्णधार सीके नायडू यांनी सुरू केलेल्या पहिल्या अंडर-१४ आणि १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.
सीएस नायडू यांच्याकडून लेग-स्पिन आणि गुगली गोलंदाजीचे डावपेच आत्मसात करणाऱ्या गायकवाड यांनी १९५२ ते १९६१ दरम्यान ११ कसोटी सामने खेळले आणि १९४८ मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून (एकत्रित प्रांताचा भाग म्हणून) रणजी पदार्पण केले. पॉली उमरीगर आणि जी रामचंद हे त्यांचे सहखेळाडू होते.
विजय हजारेंसारख्या दिग्गजांशी भागीदारी करणारे गायकवाड हे एमएस युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघाची स्थापना झाल्यावर पहिले कर्णधार बनले होते. नंतर २००० पर्यंत बडोदा रणजी संघाचे प्रशिक्षकही राहिले. १९६० च्या उत्तरार्धात बडोदा क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट प्रशासक जयवंत लेले यांच्यासह गायकवाड यांनी सहसचिव म्हणूनही काम केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी बडोदा राज्याचे नियंत्रक म्हणूनही काम केले होते.