ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली, तर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर संघाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने आयसीसीला खडे बोल सुनावले आहेत आणि उपांत्य फेरीपूर्वी दुबईला जाण्यावरूनही त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडविरुद्ध गट टप्प्यातील अखेरचा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरी गाठली. यानंतर, भारताविरूद्ध उपांत्य फेरीचा सामना असल्यास त्यांच्याविरूद्ध खेळण्यासाठी संघ दुबईला सरावासाठी गेला. पण दुबईच्या मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केल्यावर ऑस्ट्रेलियन संघ तिथेच थांबला. तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दुसरा उपांत्य सामना खेळण्यासाठी पुन्हा पाकिस्तानला लाहोरला यावे लागले. आता डेव्हिड मिलरने आयसीसीच्या वेळापत्रकावर आणि पाकिस्तानातून दुबईत आणि तेथून पुन्हा पाकिस्तानात अशा प्रवासावर पराभवानंतर वक्तव्य केलं आहे.

डेव्हिड मिलरने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून शतक झळकावले पण संघ ३६२ धावांचा पाठलाग करताना केवळ ३१२ धावाच करू शकला आणि ५० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, आयसीसीच्या वेळापत्रकाबद्दल मिलर म्हणाला, “इथून (पाकिस्तानातून दुबई) एक तास ४० मिनिटांची फ्लाइट आहे, पण महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तिथे जावं लागलं, जे अजिबातचं योग्य नाहीय.”

पुढे मिलर म्हणाला, “आदल्या दिवशी सामना खेळल्यानंतर सकाळी लवकरच्या फ्लाईटने आम्हाला जावं लागलं. त्यानंतर आम्ही दुपारी ४ वाजता दुबईला पोहोचलो आणि सकाळी ७.३० ला आम्हाला पुन्हा पाकिस्तानात यावे लागले, जे न पटण्यासारखं आहे. आम्ही पाच तास प्रवास केला आणि रिकव्हर होण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता, असं नाहीय. पण तरीही हे जे घडलं ते नक्कीचं योग्य नव्हतं.”

डेव्हिड मिलरने उत्कृष्ट खेळी करत अवघ्या ६७ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह शतक पूर्ण केले. मिलरने अखेरच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही, कारण तो मैदानात येण्यापूर्वीच आफ्रिकेच्या हातून सामना निसटला होता. २०२३ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या मिलरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतही शतक झळकावले. यासह मिलर आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत दोन शतकं झळकावणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला.