ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना म्हणजे खेळाडूंमध्ये होणारी वादावादी प्रचलितच. फिलीप ह्य़ुजच्या अकाली निधनाने ऑस्ट्रेलियन खेळाडू भावुक झाले होते. भारताविरुद्धची कसोटी मालिका ते खेळू शकतील की नाही, याविषयी साशंकता होती. मात्र व्यावसायिकता अंगी बाणवलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुन्हा आपल्या मूळ पदावर आल्याचे प्रत्ययास येत आहे.
३४व्या षटकात वरुण आरोन गोलंदाजीसाठी आला. भेदक गोलंदाजीसह त्याने वॉर्नरला अडचणीत टाकले. षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नर त्रिफळाचीत झाला. शतकाकडे कूच करणाऱ्या वॉर्नरला बाद करण्याचा भारतीयांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण पंचांनी रिप्ले पाहिला आणि त्यानुसार आरोनचा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. त्रिफळा उडाल्यानंतर वॉर्नर पॅव्हेलियनकडे परतत होता. मात्र मोठय़ा पडद्यावर हा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाल्याने वॉर्नर धावत पळत क्रिझकडे परतला.
जबरदस्त फॉर्मात असलेला वॉर्नर पुन्हा मैदानावर अवतरल्याने भारतीयांच्या निराशेत भर पडली. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असल्याने  वॉर्नरने सोडला. मात्र त्याचवेळी प्रेक्षकांनी गलका केला. यावेळी वॉर्नर आणि शिखर धवन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यात वॉटसनची भर पडली. धवनच्या साथीला आरोनही या वादात पडला. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पंचांनी मध्यस्थी केली. पुढच्या चेंडूनंतर पंच इयान गोल्ड यांनी धवनशी बातचीत केली तर कोहलीने वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी मिचेल जॉन्सनचा चेंडू कोहलीच्या हेल्मेटवर आदळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी नेहमीचा आक्रमक पवित्रा बाजूला ठेवत तातडीने कोहलीची विचारपूस केली.
उसळत्या चेंडूचे भय त्यांच्या डोक्यात होते, मात्र ते केवळ उसळत्या चेंडूपुरतेच होते, हे वॉर्नर-आरोन वादाने स्पष्ट झाले आहे.

Story img Loader