David Warner breaks Virender Sehwag record: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सर्वोतम पाच फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने हा पराक्रम केला. वॉर्नरच्या या कामगिरीमुळे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला फटका बसला असून, वीरूची आता ६व्या स्थानावर घसरण झाली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक पहिल्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडने दिलेल्या २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. वॉर्नरला ३६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून ओली रॉबिन्सनने कांगारूंना पहिला धक्का दिला. पण या ३६ धावांसह वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या सर्वोतम पाच फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. डावाची सुरुवात करताना वॉर्नरने आता ८२०८ धावा केल्या आहेत, तर वीरूने कारकिर्दीत ८२०७ धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या १०५ कसोटी सामन्यांमध्ये ४५.६०च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यादरम्यान नाबाद ३३५ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये ३४ अर्धशतकांसह २५ शतके झळकावली आहेत.
सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज-
अॅलिस्टर कुक – ११८४५
सुनील गावसकर – ९६०७
ग्रॅम स्मिथ – ९०३०
मॅथ्यू हेडन – ८६२५
डेव्हिड वॉर्नर – ८२०८*
वीरेंद्र सेहवाग – ८२०७
ऑस्ट्रेलिया इंग्लंडवर पहिल्या अॅशेस कसोटी सामन्यात रोमहर्षक विजय
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३९३ धावांवर डाव घोषित केला होता. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ३८६ धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ अवघ्या २७३ धावांत आटोपला.
२८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. पावसामुळे पाचव्या दिवशीचा खेळ उशिरा सुरू झाला. पण उस्मान ख्वाजाच्या (६५ धावा) आणि पॅट कमिन्सच्या नाबाद (४४ धावा) खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला.