पाकिस्तानच्या अझर अलीच्या द्विशतकाला ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज शतक झळकावत चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चारशे धावा पाहण्याचा योग क्रिकेटचाहत्यांना आला. अझरच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ४४३ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ बाद २७८ अशी मजल मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारच्या ६ बाद ३१० या धावसंख्येवरून खेळताना अझरने अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केला. या वेळी त्याला सोहेल खानने चांगली साथ दिली आणि या दोघांनी आठव्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. यामध्ये सोहेलने ६५ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६५ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. अझरही दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत होता. अझरने २० चौकारांच्या जोरावर नाबाद २०५ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. वहाब रियाझ बाद झाल्यावर पाकिस्तानने आपला पहिला डाव घोषित केला.

पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना वॉर्नर पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला. गोलंदाजांना लक्ष्य करत वॉर्नरने मैदानाच्या सर्व बाजूंना फटके लगावत पाकिस्तानच्या संघाला हतबल करून सोडले. वॉर्नरला या वेळी उस्मान ख्वाजाची सुरेख साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९८ धावांची भागीदारी रचली. अखेर वहीब रियाझने वॉर्नरचा काटा दूर केला आणि पाकिस्तानने सुटकेचा नि:श्वास सोडला. वॉर्नरने १४३ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरा वर १४४ धावांची अफलातून खेळी साकारली. ख्वाजानेही या वेळी वॉर्नरला सुयोग्य साथ दिली, त्याने १३ चौकारांच्या जोरावर नाबाद ९५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) :  १२६.३ षटकांत ९ बाद ४४३ डाव घोषित (अझर अली नाबाद २०५, सोहेल खान ६५; जोश हॅझेलवूड ३/५०)

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५८ षटकांत २ बाद २७८ (डेव्हिड वॉर्नर १४४, उस्मान ख्वाजा खेळत आहे ९५).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner century