David Warner retires from Test Cricket : ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यांनी सिडनी कसोटी आठ गडी राखून जिंकून मालिका ३-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान संघाला एकही सामना जिंकता आलेला नसताना सलग सहाव्यांदा असे घडले आहे. पाकिस्तानने शेवटचा विजय १९९५ मध्ये मिळवला होता. कांगारू संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा कसोटी सामना होता. त्याने विजयासह कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला. या मालिकेनंतर तो कसोटी आणि वनडेमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने आधीच सांगितले होते.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या संघाने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २९९ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पाकिस्तानला १४ धावांची आघाडी मिळाली होती, मात्र दुसऱ्या डावात त्यांच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि संपूर्ण संघ ११५ धावांतच गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले.
लाबुशेन आणि वॉर्नरने झळकावले अर्धशतक –
मार्नस लाबुशेनने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक नाबाद ६२ धावा केल्या. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीतील शेवटच्या डावात ५७ धावांचे योगदान दिले. संघाला विजयासाठी ११ धावांची गरज असताना तो बाद झाला. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथने लाबुशेनसह विजयावर शिक्कामोर्तब केला. स्मिथ चार धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात आमिर जमालने पाकिस्तानकडून पहिल्या डावात सहा विकेट घेतल्या होत्या. त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. जमालने पहिल्या डावात ८२ आणि दुसऱ्या डावात १८ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे त्याने सामन्यात एकूण १०० धावा केल्या आणि सहा विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक सामना
लाबुशेनने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली –
तत्पूर्वी, पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने ८८ आणि आमेर जमालने ८२ धावा केल्या. आगा सलमानने ५३ धावांचे योगदान दिले होते. पॅट कमिन्सने पाच विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात लाबुशेनने ६० आणि मिचेल मार्शने ५४ धावा केल्या. आमेरने सहा विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फक्त चार फलंदाज दुहेरी धावा करू शकले. पदार्पण कसोटी खेळणाऱ्या सैम अयुबने ३३, रिझवानने २८, बाबर आझमने २३ आणि आमेरने १८ धावा केल्या. जोश हेझलवूडने चार आणि नॅथन लायनने तीन विकेट्स घेतल्या.
बाबर आझम अपयशी तर डेव्हिड वॉर्नर सुपरहिट –
पाकिस्तानचा स्टार फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबर आझमने तीन कसोटी सामन्यांमध्ये लज्जास्पद कामगिरी केली. त्याला सहा डावांत २१ च्या सरासरीने केवळ १२६ धावा करता आल्या. त्याला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्याच वेळी, डेव्हिड वॉर्नरने त्याच्या शेवटच्या मालिकेतील सहा डावात ४९.८३ च्या सरासरीने २९९ धावा केल्या. या मालिकेत शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज होता. वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १११ सामन्यात ४४.५९ च्या सरासरीने ८६९५ धावा केल्या. या कालावधीत त्याने २६ शतके आणि ३६ अर्धशतके केली. एकदिवसीय क्रिकेटमधील १६१ सामन्यांमध्ये त्याने ४५.०१ च्या सरासरीने ६९३२ धावा केल्या. त्याने २२ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत.